Plan B business

व्यवसाय करावा पण नैतिकता असावी..दुसऱ्याला फसवण्याआठी नाही तर दुतसऱ्याच्या फायद्यासाठी..

ज्यांना फसवले त्याची परतफेड मिळतेच..नैतिकता महत्वाची

स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना प्लॅन ब असावा या उद्देशाने आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काही वर्षांनंतर यशस्वी माघार घेतल्यांनातर काय करावे

Copy paste

बिझनेसबद्दल मराठी मनात ही जी काही “निगेटीव्हिटी’ किंवा नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्‍यक आहे. याचा परिणाम नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या मराठी तरुण-तरुणींवर होत असतो. त्यांच्यातील सकारात्मक विचारांना पावलोपावली ठेचा लागून त्यांच्यातील नकारात्मक प्रवृत्तीला खतपाणी मिळत जाते. अनेक मराठी व्यवसायक अयशस्वी होतात, त्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले आहे.
बिझनेससाठी मोठ्या प्रमाणावर पैसा किंवा भांडवल लागते हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांची गाडी भांडवलाशी अडते. भांडवल नाही, भांडवल मिळाले नाही. पुरेसे भांडवल नाही, कोणी भांडवल द्यायला तयार नाही, अशी कारणे पुढे करण्यात येतात. बिझनेससाठी तीन प्रकारच्या भांडवलाची गरज असते. पहिले म्हणजे पैशांचे भांडवल, दुसरे म्हणजे वेळेचे भांडवल व तिसरे म्हणजे मनुष्यकाळाचे भांडवल. यापैकी वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. या भांडवलाचा योग्य उपयोग केला, तर पैशांचे भांडवल आपोआप मिळत जाते. जगातील अनेक मोठ्या कंपन्या व औद्योगिक घराण्याची सुरवात अगदी छोट्या प्रमाणात व अत्यल्प भांडवलात झाली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाची सुरवात सायकलच्या दुकानापासून झाली. “रिलायन्स’ची सुरवात मुंबईतील एका चाळीतील भाड्याच्या एका खोलीतून झाली. “मायक्रोसॉफ्ट’, “एच.पी.’, “गुगल’, “ऍपल’ या कंपन्यांची सुरवात घराच्या गॅरेजमधून झाली, तर “डेली’ची सुरवात हॉस्टेलच्या डॉर्मेटरीतून झाली. “सोनी’ या प्रख्यात जपानी कंपनीची सुरवात बॉंबहल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या तळघरातील 10 फूट स 10 फूट या छोट्या जागेतून झाली. दहा हजार रुपयांच्या अल्पशा भांडवलावर “इन्फोसिस’ची सुरवात पुण्यात दोन खोल्यांच्या जागेत झाली, तर “विप्रो’ची सुरवात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या छोट्या गावात झाली. केशवलक्ष्मी प्रसाधने (केप्र) ही पुण्यातील लोणची-मसाले बनविणारी एक प्रसिद्ध कंपनी. केवळ पाच रुपयांच्या भांडवलात त्याची सुरवात झाली. “वॉरन बफे’चे नाव जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीतील एक व सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून घेतले जाते. केवळ शंभर डॉलरच्या भांडवलावर त्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली. या सगळ्यांनी आपल्याकडील वेळेच्या व मनुष्यकाळाच्या भांडवलाचा योग्य उपयोग केला, म्हणून त्यांना पैशांचे भांडवल मिळत गेले.
बिझनेससाठी अनुभवाची गरज असते, हा दुसरा मोठा गैरसमज आहे. उलट अनुभवाची गरज नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “सबत्वे सॅंडविच’. हा वर्षाला अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेला जगातील सगळ्यात मोठा साखळी रेस्टॉरंटचा बिझनेस. फ्रेड डिल्युका या 17 वर्षांच्या शाळकरी मुलाने महाविद्यालयाची फी जमविण्यासाठी म्हणून या व्यवसायाला सुरवात केली. त्या वेळी फ्रेडला हॉटेलमध्ये जाऊन सॅंडविचेस खाल्ल्याशिवाय या बिझनेसचा दुसरा कोठलाही अनुभव नव्हता. त्याने जो काही अनुभव मिळवला, तो बिझनेसमधूनच तोसुद्धा चुका करत, ठेचा खात, शिकत आज त्यांची जगभर 21 हजारांवर रेस्टॉरंट आहेत. 275 प्रकारची सॅंडविचेस ते पुरवतात. त्याची पण सुरवात केवळ दोन हजार डॉलरच्या भांडवलावर झाली आहे. हे भांडवलसुद्धा फ्रेडच्या वडिलांच्या मित्राने पुरवले!
बिझनेससाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय घेण्याची व निर्णय राबविण्याची क्षमता. निर्णय चुकेल या भीतीपोटी अनेक जण निर्णय घेण्याचे टाळत तरी असतात किंवा चालढकल तरी करत असतात. तर बऱ्याच वेळा ही जबाबदारी इतरांवर सोपवली जाते. अनेक कुटुंबांमध्ये तरुणांमधील निर्णयक्षमता मारली जात असते. मुलांविषयीचे सर्व निर्णय पालक घेत असतात व मुलांना “होयबा’ बनवून ठेवतात. ही “होयबा’ मनोवृत्ती नोकरीसाठी ठीक असते; पण बिझनेससाठी नाही. बिझनेसमध्ये अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात. कधी कधी हे निर्णय घाई गडबडीत किंवा “ऑन द स्पॉट’ घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. निर्णय चुकला तर त्यामुळे घाबरून जाऊ नये. एकदा निर्णय घेण्याची सवय लागली की अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपोआप निर्माण होते.
बिझनेससाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार यात व मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाक डे काही ना काही तरी गुण असतातच. जे लोक मार्केटमध्ये शिरण्याचे धाडस दाखवतात, मार्केटमध्ये उभे राहण्याची जिद्द दाखवतात व मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य दाखवतात त्यांचे बिझनेस सहसा कधी बुडत नसतात.
बिझनेससाठी अजून एका गोष्टीची आवश्‍यकता असते. ती म्हणजे धोका पत्करायची तयारी. मराठी समाजामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता फार कमी आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची सवय आहे किंवा अशा वातावरणाकडे ओढा आहे. जे सदैव सुरक्षित वातावरणात वावरत असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची मानसिकता नसते; पण आपण रोजच्या आयुष्यात, पावलोपावली अनेक धोक्‍यांना सामोरे जात असतो. घरातून कार्यालयात, महाविद्यालयात किंवा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो. तेव्हा अपघाताचा धोका असतोच. हा धोका पत्करून आपण जातच असतो. हा धोका पत्करायचा नाही असे ठरवले, तर घरातच बसून राहावे लागेल. परीक्षेला जाताना परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचा धोका असतो, तसेच परीक्षेत पहिले येण्याचीपण शक्‍यता असते. अनुत्तीर्ण होण्याचा धोका पत्करून परीक्षेला बसले तर पहिले येता येते. त्यामुळे धोका हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. “नो रिस्क नो रिवॉर्ड’ म्हणजे धोका पत्करल्याशिवाय फायदा मिळत नाही.
बिझनेसमध्ये “वाकेन, पण मोडणार नाही’, हे वाक्‍य महत्त्वाचे ठरते. शिवचरित्राचा जर बारकाईने अभ्यास केला, तर शिवाजी महाराजांनी हे तंत्र वापरून व प्रसंगी पड खाऊन अनेक वेळा स्वराज्य वाचवले आहे. “अंथरूण बघून हात पाय पसरावेत’, असे वाक्‍य शिकवले जाते. याचा अर्थ आपली ऐपत बघून उड्या माराव्यात; पण पांघरूण हवे तेवढे मोठे करता येते, हे शिकवले जात नाही! ते शिकवणे आता आवश्‍यक आहे. या ठिकाणी “अंथरूण’ म्हणजे “आर्थिक पाया’, जो हवा तेवढा मोठा करता येतो. “माणसाने अल्पसंतुष्ट असावे, मिळेल त्यात समाधान मानावे’, असे शिकवले जाते. हा अल्पसंतुष्टपणा समाजासाठी घातक असतोच, पण बिझनेस करणाऱ्या माणसास फारच घातक असतो. मला आता जे मिळते आहे, यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे, या मनोवृत्तीनेच प्रगती होत असते. त्यामुळे बिझनेस करणाऱ्या माणसाने नेहमी “असंतुष्ट’ असले पाहिजे. तो आता जे काही करतो आहे, त्यापेक्षा अ धिक चांगले करण्याची इच्छा त्याने सदैव बाळगायला हवी. आता माझे पोट भरले आहे. आता अजून मिळविण्याची इच्छा नाही,’ अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा बिझनेसने “रिव्हर्स गिअर’मध्ये जायला सुरवात केली आहे. किंवा बिझनेसच्या अधोगतीला सुरवात झाली आहे असे खुशाल समजावे.
आर्थिक निरक्षरता हा मराठी माणसाचा फार मोठा दुर्गुण आहे. आर्थिक व्यवहार न समजणे, आर्थिक व्यवहार समजावून घेण्यामध्ये चालढकल करणे, हिशेब ठेवण्याची सवय नसणे, आर्थिक शिस्त नसणे, आर्थिक नियंत्रण नसणे, इतरांवर अतिविश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे ही सगळी आर्थिक निरक्षरतेची लक्षणे आहेत. बिझनेस हा शेवटी पैशांचा खेळ असतो व तो व्यवस्थित खेळता येणे आवश्‍यक असते. त्यामुळे आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.
एकीमध्ये बळ असते. हे लक्षात ठेवावे. मृदू बोलणे हे कमजोरपणाचे लक्षण समजले जाते, तर कठोर बोलणे हे सक्षमपणाचे लक्षण समजले जाते. एक मृदू शब्द दहा माणसे जोडू शकतो, तर एक कठोर शब्द शंभर माणसे तोडू शकतो, हे लक्षात ठेवावे. या गोष्टी अमलात आणल्या तर उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात मराठी समाज स्वतःचे एक आगळेवेगळे व आदरणीय स्थान निर्माण करेल. पाहिजे फक्त प्रबळ इच्छाशक्ती, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा!
हा लेख सर्वानी वाचल्याने उद्योग-धंदा, व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळेल या हेतूने पाठवीत आहे.

One comment

  1. Very Inspiretive..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat