नीलगाय

सध्या चर्चेत असलेली नीलगाय बद्दल माहिती

 • नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे.
 • प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ नाव पडले आहे.
 • त्याच्या नावात जरी ‘गाय’ असले, तरी हा प्राणी आशियातील सर्वांत मोठ्या आकारमानाचे हरिण आहे.
 • त्याचे मूळ वसतिस्थान भारत व पाकिस्तान आहे. भारतात हिमालयाचा पायथा ते मैदानी प्रदेशापासून दक्षिणेस कर्नाटकापर्यंत तसेच पश्चिमेस गीर अभयारण्य व राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाक सीमा प्रदेशापासून पूर्वेकडे आसाम व पश्चिम बंगालपर्यंत हा प्राणी आढळतो. भारतात सु. १ लाख नीलगायी असल्याचा अंदाज आहे.
 • नीलगायीची शरीररचना गायीपेक्षा घोड्यासारखीच जास्त असते. लांब मान, मानेवरील आखूड व ताठ आयाळ, लांबट व निमुळते मस्तक, फुगीर छाती, लांब आणि मजबूत पाय व शेपटीकडे निमुळता होत जाणारा शरीराचा आकार ही त्याच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये आहेत.
 • शेपूट मात्र गायीसारखे असून टोकाला काळ्या केसांचा झुपका असतो.
 • नर व मादी दोघांच्याही शरीरावर सारख्याच प्रकारच्या खुणा आढळतात. उदा., प्रत्येक गालावर दोन पांढरे ठिपके असतात आणि ओठ, हनुवटी, गळा, कानांची आतील बाजू व शेपटीची आतील बाजू पांढरी असते. घोट्यावर काळ्या पांढऱ्या रंगाची वलये असतात. तसेच नर-मादीच्या गळ्यावर केसांचा झुपका असतो.
 • वजन १२०-१४० किग्रॅ. असते. खांद्याजवळ उंची १.२-१.५ मी. आणि डोक्यासह लांबी १.८-२ मी. असते. शेपूट ४०-४५ सेंमी. लांब असते. फक्त नरांना शिंगे असतात. नराची शिंगे सु. २५ सेंमी. लांब असतात.
 • मादीचा रंग पिंगट असून ती नरापेक्षा आकारमानाने लहान असते.
 • नीलगायींचे वास्तव्य सहसा विरळ झाडे असणाऱ्या टेकड्या, सपाट अथवा उताराचे गवताळ प्रदेश तसेच लहान झुडपे असलेल्या मैदानात असते.
 • ते दाट वने टाळतात. गवत आणि वनस्पतींची पाने, फुले, फळे, बिया, फांद्यांचे शेंडे इत्यादींवर नीलगायी उपजीविका करतात.
 • चारा कमी पडल्यास ते पिकांची प्रचंड नासाडी करतात.
 • ते दिवसा सक्रिय असतात व कडक उन्हात देखील फारच थोडा वेळ सावलीत विश्रांती घेतात.
 • उन्हाळ्यात नियमित पाणी पिणारे हे प्राणी थंडीच्या दिवसात २-३ दिवस पाण्याशिवाय राहू शकतात.
 • त्यांचे वास्तव्य मात्र पाणवठ्याजवळच असते.
 • नीलगायींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपली विष्ठा टाकण्यासाठी एका ठराविक जागीच येतात.
 • नीलगायी कळपाने राहतात. एका कळपात साधारणपणे १०-२० प्राणी असतात.
 • विणीचा हंगाम सोडल्यास नर व मादी वेगवेगळे कळप करून राहतात.
 • लहान वासरे मादींच्या कळपात असतात.
 • वाघ व सिंह हे नीलगायीचे मुख्य भक्षक आहेत.
 • नीलगायींची दृष्टी व घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात.
 • वेळ पडल्यास घोड्यापेक्षा जास्त वेगाने ते पळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat