हवामान,वारा,चक्रीय वादळे

हवामान,वारा,चक्रीय वादळे

झंझावात, तुफान, चक्रीवादळ, आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात… वाहणाऱ्या वाऱ्याला त्याच्या वेगानुसार आणि प्रकारानुसार अशी कितीतरी वेगवेगळी नावं आहेत.

#पश्‍चिम अटलांटिकमध्ये तयार होणाऱ्या वादळांना झंझावात (हरिकेन) म्हणतात, तर पश्‍चिम प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या वादळांना आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात (टायफून) म्हणायची प्रथा आहे. बाकीच्यांना चक्रीवादळ (सायक्‍लोन) असं म्हटलं जातं.

#मॉन्सूनच्या मुख्य पावसाआधी येणाऱ्या पावसाला आपण ‘वळिवा’चा पाऊस असं म्हणतो. जोराचं वारं, अचानक आभाळ भरून येणाऱ्या ढगांची बहुतेक वेळा सायंकाळ होण्याआधी होणारी गर्दी आणि नंतर येणाऱ्या जोरदार सरींनी त्याची हजेरी लागते. उकाड्यानं हैराण झालेले आपण या अचानक होणाऱ्या शिडकाव्यानं आनंदून जातो; पण या अचानक आलेल्या सरींमध्ये ‘पावसाळ्या’ची नुसती चाहूलच असते. प्रत्यक्ष पावसाळा मात्र काही दिवसांनी सुरू होतो; पण हे मधले काही दिवस मात्र तगमग देणारे असतात. हेच दिवस जगभर आणखी एका गोष्टीसाठी, ‘मोसमी वादळांच्या सुरवाती’चे दिवस ठरतात.

#साधारणतः २१ किंवा २२ जूनला सूर्य आकाशात सर्वात उत्तरेकडं असतो. त्यानंतर त्याचं दक्षिणायन सुरू होतं.

-उन्हाळ्यात जे जोराचे वारे वाहतात, त्यांना आपण सहसा वादळ म्हणत नाही. गोलाकार फिरणारी धुळीची वावटळ मात्र पठारी प्रदेशात जागोजागी दिसते; पण जी जोरात आणि सलग वाहणारी गरम हवा; विशेषतः दुपार ते संध्याकाळ या वेळात दिसून येते, तिला ‘लू’ म्हणतात.

वाऱ्याची दिशा आणि वेग यावर तो ‘मंद वारा’ आहे, झुळूक आहे की तो सोसाट्याचा वारा आहे हे ठरत असतं. पूर्वी नाविकांसाठी वाऱ्याच्या वेगाकरिता ‘बोफोर्ट-क्रमांक’ वापरत असत. एका नाविक अधिकाऱ्यानं, फ्रान्सिस बोफोर्टनं १८०५ मध्ये हे कोष्टक तयार केलं होतं. (यात एक नॉट म्हणजे ताशी १.८५२ किलोमीटर वाऱ्याचा वेग धरलेला आहे.)

(० ते १ नॉट) क्रमांक ० = स्तब्ध हवा, हालचाल नाही. या वेळी शेकोटीचा धूर सरळ उभा वरच्या दिशेनं जातो.

(१ ते ३ नॉट) क्रमांक १ = वाऱ्याची दिशा धुरामुळं कळते; पण दिशादर्शक यंत्रावर मात्र परिणाम दिसत नाही.
(४ ते ६ नॉट) क्रमांक २ = झाडाची पानं सळसळतात, तोंडावर वारा जाणवतो, सामान्य दिशादर्शकही हलतो.
(७ ते १० नॉट) क्रमांक ३ = झाडाच्या डहाळ्या म्हणजे छोट्या फांद्या डोलू लागतात, लहान झेंडे फडफडतात.
(११ ते १६ नॉट) क्रमांक ४ = झाडाच्या छोट्या फांद्या हेलकावे घेत हलू लागतात, धूळ उडते, कागदाचे कपटे या वाऱ्यानं उडू लागतात.
(१७ ते २१ नॉट) क्रमांक ५ = लहान झाडंच आता डोलू लागतात. तलावाच्या पाण्यावर या वाऱ्यानं छोट्या छोट्या टोकदार लाटा तयार होतात.
(२२ ते २७ नॉट) क्रमांक ६ = झाडाच्या मोठ्या शाखा डोलतात. छत्री सांभाळणं कठीण होतं. दूरध्वनीच्या टांगलेल्या तारांमधून शीळ घातल्यासारखा आवाज येऊ लागतो.
(२८ ते ३३ नॉट) क्रमांक ७ = संपूर्ण वृक्ष हलू लागतात. झाडांच्या छोट्या नाजूक फांद्या तुटायला लागतात. या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं चालणं मुश्‍किल होतं.
(३४ ते ४० नॉट) क्रमांक ८ = वृक्षांच्या फांद्या तुटायला लागतात. सामान्य मानवी जीवनाला अडथळे निर्माण होऊ लागतात. (३५ नॉटच्या वर वाऱ्याचा वेग असेल, तर म्हणजेच सुमारे ६३ किलोमीटर ताशी वेगाचे वारे म्हणजे वादळ असं आजकाल मानण्यात येतं.)
(४१ ते ४७ नॉट) क्रमांक ९ = इमारतींना धोका निर्माण होतो. कौलं, छताचे पत्रे उडतात, भिंती कोसळतात.
(४८ ते ५५ नॉट) क्रमांक १० = जमिनीवर एवढ्या प्रमाणातला वारा फारच कमी प्रमाणात अनुभवास येतो. मात्र, उंच इमारतींचा फार मोठा विध्वंस या वाऱ्यामुळं होतो. या वाऱ्याच्या वेगानं वाहनं रस्त्याबाहेरही फेकली जातात. गाड्या रुळावरून खाली घसरतात. गलबतांना-जहाजांना तर फारच धोका; कारण ते उलटतात किंवा लाटांच्या तडाख्यानं फुटतातही.
(५६ ते ६३ नॉट) क्रमांक ११ = फारच क्वचित अनुभवास येतो; पण चक्रीवादळात वाऱ्याला एवढा वेग असू शकतो. त्यानं फार मोठा आणि विस्तृत प्रदेशात विध्वंस होतो.
(६४ नॉटच्या पुढं) क्रमांक १२ = अपरिमित नुकसान करणारी स्थिती. ही स्थिती फक्त काही ठिकाणीच अनुभवास आलेली आहे.

#वारा किंवा हवेत हालचाल निर्माण होण्याची प्रमुख कारणं म्हणजे वातावरणातल्या हवेवर होणाऱ्या निरनिराळ्या प्रेरणांचा (बलांचा) परिणाम.
१) पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, जे सर्वच पदार्थांवर सततच कार्य करत असतं,
२) कमी-अधिक उष्णतेमुळं हवेची घनता कमी-अधिक होणं,
३) त्यामुळंच हवेच्या दाबात होणारा फरक,
४) कोरिऑलिस बल,
५) घर्षण आणि
६) केंद्रोत्सारी (सेंट्रिफ्युगल) बल या प्रेरणा हवेच्या स्थितीवर बदल घडवून आणतात. त्यामुळं वारे निर्माण होतात. गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम हा जमिनीपासून वर उभ्या दिशेनं होत असल्यानं तो वादळी वाऱ्यांसाठी फारसा परिणाम दाखवत नाही; पण कोरिऑलिस बल मात्र वाऱ्यांवर जागतिक परिणाम दाखवतं

#काय आहे कोरिऑलिस बल?

-फ्रेंच गणिती गास्पार ग्युस्ताव कोरिऑलिस यानं हे बल कसं कार्य करतं ते त्याच्या १८३५ च्या एका शोधनिबंधात दाखवून दिलं. यात होतं काय की पृथ्वीच्या रोजच्या परिवलनामुळं – एका दिवसात स्वतःभोवती एक फेरी घेण्याच्या वेगामुळं – विषुववृत्तावरून जसजसे वर किंवा खाली म्हणजे उत्तरेस किंवा दक्षिणेस जाणाऱ्या वाऱ्याची दिशा एका कमानीसारखी वळताना भासते. उत्तर गोलार्धात ही गती चक्राकार; पण घड्याळ्याच्या उलट दिशेनं असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या सुलट्या दिशेनं असते. त्यामुळे जागतिक वाऱ्यांच्या दिशांवर हा परिणाम सततच दिसून येतो.

#जमिनीवर असणारी धूळ, धूर आणि इतर पदार्थांमुळं वारे अधिक सघन होतात. त्यामुळं ते वाहताना त्यात होणारं घर्षण जास्त, तर महासागरावर असणाऱ्या वातावरणात घर्षणबल कमी आढळतं. या सगळ्याचा परिणाम वारे वाहण्यावर होतो. वाऱ्याचा वेग वाढला, की त्यालाच आपण ‘वादळ’ म्हणतो.

चक्रीवादळं ही उष्णकटिबंधात तयार होणारी आणि दोन्ही गोलार्धांत विषुववृत्तापासून दूर कमानीच्या आकारात पसरत मार्गक्रमण करणारी असतात.

-वादळांचे विविध प्रकार आहेत. (हरिकेन) झंझावात, (स्टॉर्म) तुफान, (सायक्‍लोन) चक्रीवादळ, (टायफून) आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात, असे शब्द त्यासाठी आहेत.
– या प्रकारात जरी थोडे फरक असले, तरी या साऱ्यांचा उगम उष्णकटिबंधात (ट्रॉपिकल रीजनमध्ये) होत असल्यानं सगळ्यांनाच ‘ट्रॉपिकल सायक्‍लोन’ म्हणजे ‘उष्णकटिबंधीय
चक्रीवादळं’ म्हणतात.

#विषुववृत्तावर कधीही चक्रीय वादळ तयार होत नाही
कारण कोरिओलीस बल तेथे नसते.

#चक्रीवादळं कशी तयार होतात?

-चक्रीवादळं तयार होण्यासाठी मुख्य सहभाग असतो समुद्राच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचं तापमान किती झालं आहे याचा.
-उन्हाळा-पावसाळा आणि हिवाळा-उन्हाळा या दोन्ही ऋतुबदलांच्या दरम्यान ही वादळं तयार होतात असं दिसतं. -विषुववृत्ताच्या पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण या भागात या वादळांचा अभाव दिसतो; पण त्याच्या वरच्या १८ अंश अक्षांशादरम्यानच्या सागरी विभागात आणि जिथं सागराच्या पृष्ठभागाचं तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस होतं, तिथंच ही वादळं निर्माण होतात असं दिसतं.
-या ठिकाणी वाऱ्यांची आणि वादळांचीही दिशा आधी पूर्वेकडून पश्‍चिमेकडं आणि नंतर ती वर उत्तरेकडं वळत कमानीसारखी परत ईशान्येकडं जाताना दिसते.
-सागरावरच्या अधिक तापमानाच्या जागी गरम हवा वरच्या दिशेनं आधी जाऊ लागते. त्यामुळं तिथं एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो. या जागेकडं (कमी दाबाच्या स्तंभाकडं) वाहणारे वारे सोबत पावसाळी ढगही घेऊन येतात. कारण वाढलेल्या तापमानानं सागराच्या पाण्याची वाफही हवेत बरीच तयार झालेली असते. वर जाणाऱ्या हवेच्या स्तंभाकडं येणारे वारे आणि ढग त्याभोवती वक्राकार, वर्तुळाकार फिरू लागतात. वर वर उचलले जाऊ लागतात. त्यांची जागा दुसरे ढग आणि वारे घेत ते मोठ्या वेगानं गोलाकार घुमू लागतात.
-पृथ्वीच्या परिवलनामुळं, कोरिऑलिस प्रेरणेमुळं हे वारे कमानीच्या मार्गानं पुढं कूच करू लागतात, त्यातून घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा जन्म होतो.
-पाण्याचं बाष्प असणारे ढग यात खूप उंचीवर पोचले, की तिथल्या थंड वातावरणानं त्या बाष्पाचं द्रवीभवन होऊन पाऊस पडू लागतो.

-चक्रीवादळाच्या मधल्या जणू रिकाम्या राहिलेल्या भागाला चक्रीवादळाचा ‘डोळा’ असं म्हणतात. त्या जागी वाऱ्याचा आडव्या दिशेनं फारसा वेग नसतो; पण या जागेकडं येणारे वारे मात्र प्रचंड वेगवान असतात, तर वर गेल्यावर ते जेव्हा पसरट होतात, तेव्हा त्यांचा वेग मंदावतो.
-या डोळ्यापासून जसजसे दूर जाऊ तसतसाही हा वेग कमी झालेला दिसतो. कधी कधी अशी चक्राकार गती असणारे अनेक स्तंभ एकाच मोठ्या चक्रीवादळाचा भाग बनतात. अशा वेळी त्यांची एकूण ऊर्जा वाढते. ते जास्त हानिकारक ठरतात.

उच्च अक्षांशमधील चक्रीवादळे

-उत्तरेकडं अधिक अक्षांशावरही चक्रीवादळं तयार होतात. त्यांचा मार्ग या उष्णकटिबंधातल्या वादळांच्या उलट दिशेनं असतो.
– तिथले वारे पश्‍चिमेकडून पूर्वेकडं जाणारे असतात त्यामुळं असं होतं;
-शिवाय अशा वादळांचा कालावधीही वेगळा असतो. ही वादळं नोव्हेंबरच्या दरम्यान अधिक असतात. यांच्यामुळं पावसाऐवजी बर्फ जास्त प्रमाणात पडतो आणि थंडीची लाटही येते.

#चक्रीय वादळे नावे

-वादळं कुठं होतात, त्यांच्या जागा, त्यांचा अंदाजित कालावधी आणि त्यांच्यातल्या वाऱ्याचा वेग या वर्गीकरणातून विविध हवामान संस्थांना अशा चक्रीवादळांची नावं देण्यासाठी ठराविक क्षेत्रांसाठी नेमून दिलेलं आहे.
-त्यांनी आधीच ठरवलेल्या यादीतून ही नावं देण्यात येतात.
– साधारणपणे ताशी ६३ किलोमीटरपेक्षा जास्त वाऱ्याचा वेग आहे, अशा चक्राकार फिरणाऱ्या वादळाला, ते पाच ते सहा दिवसांपेक्षा जास्त टिकणारे असल्यास नाव देण्यात येतं.
– उत्तर अटलांटिक; तसंच पूर्व प्रशांत महासागराच्या क्षेत्रासाठी अमेरिकेतल्या, पश्‍चिम प्रशांत महासागरासाठी जपान, उत्तर हिंदी महासागरासाठी भारतीय, दक्षिण-पश्‍चिम हिंदी महासागरासाठी मादागास्कर, ऑस्ट्रेलियाशेजारच्या विभागासाठी इंडोनेशिया, दक्षिण प्रशांत महासागरासाठी न्यूझीलंड, तर दक्षिण अटलांटिक महासागरासाठी ब्राझीलच्या हवामान वेधशाळांना अशी नावं देण्याची मुभा असते.
– ही नावं आधीच तयार केलेल्या आणि मान्यता मिळवलेल्या यादीतून देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat