9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महत्वाच्या चालू घडामोडी Revision

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) घटनेमधील काही बदलांना मान्यता दिली आहे.

 • बीसीसीआयने सुचवल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या ‘एक राज्य, एक मत‘ ही शिफारस रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त क्रिकेट संघटना आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तीन क्रिकेट संघटनांनाही दिलासा मिळाला आहे.

दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे.

 • स्वॅट महिला कमांडो पथक असलेले दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार .स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेशकरण्यात येईल. ईशान्य भारतातील 36 महिलांचा या कमांडो युनिटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

.

निधन : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी

 • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे १३ ऑगस्ट रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
 • सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला. ते १९५७साली एमए झाले व इंग्लंडच्या मिडल टेम्पल शिक्षणसंस्थेतून बॅरिस्टरही झाले. ते प्रख्यात वकीलही होते.
 • वीणापाणी देवी या त्यांच्या मातोश्री होत्या. त्यांचे वडील निर्मलचंद्र चॅटर्जी हे ख्यातनाम वकील आणि हिंदुत्ववादी होते. हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्षही होते.
 • त्यांनी १९६८मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. २००८पर्यंत ते माकपमध्येच होते. ते माकपच्या केंद्रीय समितीचेदेखील सदस्य होते.
 • १९७१मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत १० वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. २००४ ते २००९ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते.
 • चॅटर्जी यांच्या निमित्ताने लोकसभेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच डाव्या पक्षाच्या सदस्यांना संधी मिळाली होती.
 • २००८मध्ये अणु कराराच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान मनमोहनसिंह सरकारचा पाठिंबा डाव्या पक्षांनी काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांनाही लोकसभा अध्यक्षपद सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पद न सोडल्याने पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
 • किपिंग द फेथ: मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत.
 • ते लोकसभा अध्यक्षपदी असताना जुलै २००६मध्ये लोकसभेसाठी विशेष वाहिनी सुरु झाली. या वाहिनीचे प्रक्षेपण २४ तास सुरु झाले.
 • पश्चिम बंगालमध्ये नवीन उद्योग सुरू व्हावेत व गुंतवणूक व्हावी यासाठी ज्योती बसूंनी सोमनाथ चॅटर्जी यांना औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनविले होते.
 • लोकसभा अध्यक्षपदाची मुदत २००९मध्ये संपल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते.
 • संपूर्ण राजकीय कारकिर्दीत चॅटर्जी यांना एकच पराभव पत्करावा लागला होता. १९८४मध्ये जादवपूर मतदारसंघातून त्यांना ममता बॅनर्जी यांनी मात दिली होती.
 • सोमनाथ चॅटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

९२वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये

 • अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुमारे ४५ वर्षांनंतर यवतमाळला साहित्य संमेलन होणार आहे.
 • याआधी यवतमाळमध्ये १९७३मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. ग. दि. माडगूळकर या संमलेनाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण उद्घाटक होते.

सुर्याच्या अभ्यासासाठी नासाकडून अंतराळ यानाचे प्रक्षेपण

 • नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने सुर्याच्या अभ्यासासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ या यानाचे १२ ऑगस्ट रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
 • अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील केप केरनेवल या हवाई दलाच्या प्रक्षेपण केंद्रावरुन हे डेल्टा-४ या जगातील दुसऱ्या सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले.
 • अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरुन या यानाचे नाव ठेवण्यात आले आहे.
 • लाखो किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या यानामध्ये आहे. तसेच हे यान पहिले मानवविरहित यान असल्याने याला मोठे महत्व असे प्राप्त झाले आहे.
 • या यानाद्वारे सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमांतून सुर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यात येणार आहे.
 • एका कारच्या आकाराचे हे अंतराळयान सुर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी (सुमारे ४० लाख मैल) अंतरावर जाणार आहे.
 • यापूर्वी सोडण्यात आलेल्या यानांपैकी आजवर कोणत्याही यानाने सुर्याच्या इतक्या जवळ जाऊन त्याच्या तापमानाचा आणि उष्णतेचा सामना केलेला नाही.
 • सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आणि प्रकाश, तसेच सुर्यापासून निघणाऱ्या सौर लहरींचा व सूर्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.
 • सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा त्याच्या वातावरणाचे तापमान ३०० पटींनी अधिक असते. त्याचे कारण शोधून काढणे; तसेच सौर कण आणि सौरवादळांची निर्मिती कशी होते, याचा अभ्यास करण्याचा या मोहीमेचा हेतू आहे.
 • पुढील ७ वर्षे हे यान सुर्याचे वातावरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पावर नासाने १.५ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत.
 • हे यान जेव्हा सुर्याच्या सर्वाधिक जवळून जाईल तेव्हा तिथले तापमान २५०० डिग्री सेल्सिअस इतके असेल. ते झेलण्यासाठी या यानाला आधुनिक थर्मल प्रोटेक्शन यंत्रणा बसविली आहे.
 • या यानाचा ताशी वेग ४.३० लाख किमी इतका असून, सुरुवातीला हे यान शुक्राच्या कक्षेभोवती फिरणार आहे. त्यानंतर शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत आपला निश्चित वेग गाठत, पुढे सुर्याच्या दिशेने रवाना होईल.
 • त्यानंतर हे यान सुमारे ७.२४ लाख किमी प्रती तास वेगाने प्रवास करेल. कोणत्याही मानवनिर्मित वस्तूच्या गतीपेक्षा ही गती सर्वाधिक आहे.
 • साधारण ७ वर्षांनी हे यान सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करेल. हे यान २४ वेळा सूर्याला फेऱ्या मारणार आहे.
 • ११ ऑगस्ट रोजी या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते थांबवण्यात आले होते.

निधन : नोबेल विजेते जेष्ठ साहित्यिक व्ही एस नायपॉल

 • नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक व्ही एस नायपॉल यांचे ११ ऑगस्ट रोजी लंडन येथे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
 • विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी ३० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना २००१मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 • तसेच त्यांना १९७१मध्ये बुकर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी त्यांना नाइटहुड सन्मान देऊन गौरविले होते.
 • १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो. भारतीय वंशाच्या नायपॉल यांनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते.
 • त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते.
 • इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. समकालीन ब्रिटिश लेखकांपेक्षाही नायपॉल यांचे इंग्रजी उत्तम होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट साहित्यामध्ये गणना होते.
 • अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे.
 • नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पहायला मिळतो.
 • त्यांच्या इतर प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘इन ए फ्री स्टेट’, ‘ए वे इन द वर्ल्ड’, ‘हाफ ए लाईफ’ आणि ‘मॅजिक सीड्स’ ही महत्त्वाची आह

देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील 36 स्थानकांचा समावेश

 • रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ‘अ-1’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते सातव्या क्रमांकावर असून देशातील अव्वल दहा स्थानकांत त्याला स्थान मिळाले आहे.
 • या श्रेणीत मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी सुधारणा केली असून या स्थानकांनी अनुक्रमे 9व्या आणि 10व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत‘ अहवालांतर्गत ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अहवालात देशातील 407 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-1’ श्रेणीमधील 75 रेल्वे स्थानकांत राज्यातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
 • 50 कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके ‘अ-1’ श्रेणीत आहेत. ‘अ’ श्रेणीमध्ये 332 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
 • ‘अ-1’ या श्रेणीत पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे.
 • देशातील 332 रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील 26 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगांव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.

वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास :

 • एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत.
 • तर 1 मे 2018 पासून ‘शहीद सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सैन्य दलासह अन्य सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आजीवन मोफत प्रवास पास देण्यात येत आहे.

पंतप्रधान जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत)

 • २५ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला देशभरात पंतप्रधान जनआरोग्य योजना योजनेचा शुभारंभ होईल, असे त्यांनी जाहीर केले.
 • देशातील गरीब आणि सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळावे. मोठ्या आजारांसाठी चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावे, हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
 • या योजनेंतर्गत नवीन रुग्णालये उभारले जातील आणि यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.
 • योजनेत पारदर्शकता राहावी आणि सर्वसामान्यांना या योजनेचा सहज लाभ घेता यावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
 • योजनेची वैशिष्ट्ये
 1. १०.७ कोटी गरीब कुटुंबियांना जोडण्याचे लक्ष्य.
 2. प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचे आरोग्य विमा कवच.
 3. आर्थिक निकषांवर कुटुंबाची निवड होणार.
 4. पुर्णपणे कॅशलेस सुविधा.
 5. १.५ लाख आरोग्य केंद्र सुरु करणार.
 6. खासगी कंपन्यांनाही सहभागी होता येईल.
 7. केंद्र सरकार ६० तर राज्य सरकार ४० टक्के खर्च उचलणार.

राज्य सरकारकडून भूमिहीन कुटुंबांना मोफत शेतजमीन

 • महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मोफत शेतजमीन देण्यात येणार आहे.
 • त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार ४ एकर जिरायत जमिनीसाठी प्रतिएकरी ५ लाख याप्रमाणे २० लाख रुपये आणि २ एकर बागायती जमिनीसाठी प्रतिएकरी ८ लाख याप्रमाणे १६ लाख रुपये अनुदान देणार आहे.
 • सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या काम करतील.
 • त्यांना मदत करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात उपसमित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
 • लाभार्थ्यांची निवड, जमिनींची खरेदी आणि त्यांचे वाटप याची जबाबदारी या समित्यांवर असेल. ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवाण्यात येणार आहे.
 • या योजनेसाठी संबंधित कुटुंब भूमिहीन असणे आवश्यक आहे. परंतु अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बहुतांश कुटुंबे अत्यल्प भूधारक असल्यामुळे ते भूमिहीन या निकषात बसत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरीब कुटुंबे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 • अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सर्वप्रथम २००४-०५साली जमीन देण्याची योजना सुरू करण्यात आली.
 • मात्र त्या वेळी लाभार्थ्यांना जमिनीच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागत होती. लाभार्थ्यांना त्यासाठी बँकेचे कर्ज काढावे लागत होते.
 • सरकार ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायतीसाठी प्रतीएकरी ३ लाख रुपये याप्रमाणे अनुदान देत होते.
 • परंतु जमिनीच्या किमती वाढल्यानेया रकमेत जमीन मिळणे अशक्य होते. शिवाय, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना बँकांचे कर्ज मिळणेही अशक्य होत असे.
 • त्यामुळे सरकारने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबरोबरच योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह

 • राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांची ९ ऑगस्ट रोजी निवड झाली.
 • संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश यांना १२५ तर हरिप्रसाद १०५ मते मिळाली.
 • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आवाहन केल्याने ओडिशातील बिजू जनता दल, तमिळनाडूतील अण्णा द्रमुक, तेलंगणातील टीआरएस या पक्षांनी हरिवंश यांना मतदान केले.
 • काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या काही सदस्यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. तसेच टीआरएस, बीजेडी आणि अन्य प्रादेशिक पक्षांनाही आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला अपयश आले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
 • याउलट भाजपाच्या धुरिणांनी विविध प्रादेशिक पक्षांशी योग्य ताळमेळ जमवून मतांचे गणित कुशलतेने सोडवले आणि मोदी सरकारच्या विरोधकांचे ऐक्य हे पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

हरिवंश नारायण सिंह

 • हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबाने आपली शेती गंगा नदीच्या प्रवाहामुळे गमावली होती.
 • हरिवंश हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे गाव असलेल्या सिताब दियारा गावातील रहिवासी आहेत.
 • जिद्दीने शिक्षण पूर्ण करून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक हिंदी वृत्तपत्र धर्मयुगमधून पत्रकारितेस सुरुवात केली.
 • त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी अधिकारी म्हणून काही काळ काम करून ते पुन्हा एकदा पत्रकारितेत आले.
 • १९८९मध्ये त्यांनी रांची येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रभात खबर वृत्तपत्रात नोकरी सुरू केली. पुढे ते या वृत्तपत्राचे संपादक देखील झाले.
 • नंतर त्यांनी काही काळ माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रातील संपादकपदाचा राजीनामा दिला.
 • चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर ते पुन्हा एकदा प्रभात खबर वृत्तपत्रात रुजू झाले. २०१४साली ते जेडीयूकडून राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त झाले.
 • हरिवंश यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेसाठी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बहुआरा गाव दत्तक घेतले होते.
 • तसेच त्यांच्या खासदार निधीमधील मोठी रक्कम बिहारमधील आर्यभट्ट ज्ञान विश्वविद्यालयाती संशोधनावर खर्च होतो.
 • साधेपणाने जीवन व्यतित करणारे हरिवंश हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. नितीश कुमार यांची राज्यात चांगली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये हरिवंश यांचा हात असल्याचे म्हटले जाते.
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat