स्व’च्या_शोधात… #In_Search_of_Self प्रमोद भाऊसाहेब वडवकर

‘स्व’च्या_शोधात…
#In_Search_of_Self

परवा पासून त्याचा फोन बंद येत होता. माझंही तसं काही अर्जंट काम नव्हतं… परंतु 2-3 प्रयत्न करूनही बंद आल्याने चौकसता जरा वाढली…
सोबतच्या मित्रांनाही विचारलं “फोन झाला होता का?”
उत्तर आलं, “नाही.”
सोशल मीडियावर ही गेल्या एक-दोन दिवसात त्याची नवीन पोस्ट नव्हती.
मी मित्रांकडे अजून एकदा-दोनदा विचारल्यावर मात्र विषयाला तोंड फुटले…
एकाने म्हटलं, “अरे! तो गावी गेला असेल बहुतेक…”
दुसरा म्हटला, “मैत्रिणीसोबत फिरायला गेला असेल…!”
तिसरा म्हणाला, “काही विपरीत तर……….?”
आता मात्र शंकेची पाल चुकचुकली….
रोज सामाजिक माध्यमातून अनेक घटना घडलेल्या समोर येतात… पण तो असं काही टोकाचं पाऊल उचलओलLलLअपKही काही घडलं (घडत) नव्हतं त्याच्या आयुष्यात…. मग हा असा अचानक गायब झाला कुठे???
काही वेळानं त्याच्या गावीही फोन केला… सहज चौकशी केली पण तिकडून उत्तर तेच, ” दोन-तीन दिस झालं तेचा फोन नाय आला.”

सामाजिक माध्यमातून शोध घेणं फोल ठरलं… मग हळूहळू जो तो आपल्या कामात व्यस्त झाला… गायब प्रकरण थोडंस गायब झाला.
दुसरा दिवस उजाडला. रोजचेच रुटीन सुरू झाले… मित्राचं असं अचानक गायब होणं किंवा संपर्क न होणं हे अभ्यासाच्या व्यग्र वेळापत्रकात जरासं बाजूला पडलं. परंतु थोडासा विचार यायचाच अधूनमधून…

आजच्या काळात अस्तित्वात असण्याची एक व्याख्याच बनली आहे की, कुठेतरी सोशल मीडियावर active असेल, Whatsapp ग्रुपवर पोस्ट/reply असेल, मेसेज करत असेल तरच ती व्यक्ती मुख्य प्रवाहात आहे. या आभासी जगात वावरणं म्हणजेच सर्वस्व असं काहीतरी अन्यथा……..
पण मला वाटतं असं एकच-एक तत्व असू नये!
आजही अनेक लोक आभासी जगात मोजका वावर ठेवून भौतिक जगात यशोशिखरे पदांक्रांत करत आहेतच की…

दुपारचे साडेबारा वाजले जेवणाची वेळ झाली… जेवण करतानाही या गायब मित्राबद्दल आमच्या ग्रुप मध्ये चर्चा झाली… आणि असेच इकडचे तिकडचे तर्कवितर्क लढवले गेले…
जेवण झाल्यावर पुन्हा लायब्ररीत येऊन बसलो… काही वेळानं अचानक टेबलवर ठेवलेला मोबाईल भर्रर्रर्रर्र-भर्रर्रर्रर्र (vibration) वाजायला लागला… स्क्रीनवर त्याचे नाव झळकले…. आश्चर्याचा धक्काच बसला!!
पटकन गडबडीत उठलो. उठताना खुर्चीचा मोठा आवाज होतोय याकडे नीट लक्ष न देता थेट दाराबाहेर पडलो….
“हॅलो, अरे कुठे आहेस तू!”, जरा चढ्या आवाजात.
” अरे! जरा हळू, शांत हो!”, असा आवाज पलीकडून आला.
” अरे पण तू…..”
” मी आलोय बाहेर, ये तू खाली…”
पटकन पायऱ्या उतरून गेलो लायब्ररीच्या बाहेर….

हा उभा होता शांतपणे. स्मितहास्य चेहऱ्यावर… त्याला पाहून जरा बरं वाटलं.
मग सुरू झाली माझी प्रश्नावली.
काय, कुठे, कसा, कधी, केंव्हा ????? आदी…
थोडा pause घेऊन तो बोलू लागला…
“सोशल मीडियाच्या आहारी जाणं परवडत नाही रे!!!”
सकाळी झोपेतून उठले की डोळे अर्धवट उघडे आहेत तोच whatsapp, फेसबुक वरच्या पोस्ट्स पाहण्याची घाई…
पूर्ण दिवसभर अगदी झोपेपर्यंत कोणी काही post केलंय तर ते पाहणे होतेच. मग लाईक करा. कमेंट करा. शेयर करा. माझी पोस्ट लाईक, कंमेंट केली पाहिजे म्हणून त्यांच्याही पोस्टवर मी क्लिक करतोच…
स्टेटस टाकला की किती जणांचे views आले ते सारखं जाऊन पाहणं. हे आणि असं सगळं बरंच काही….
” हे सगळं क्षणिक रे!”
” त्याचा आपल्या ध्येय गाठण्याच्या वाटचालीत किती उपयोग होतो?”
असा त्याचा सूर होता…
हा सूर तीन दिवसांपूर्वीचा तो आणि आजचा तो यातील मोठ्या बदलाचा भाग होता…
पुढे तो बोलू लागला… आभासी जग हे नक्कीच एक मोठे platform आहे निःशंक! परंतु यात त्याच्या आहारी कितपत जायचं हा यक्ष प्रश्न आहे…
आपण आपलं ध्येय आभासी जगातील अनावश्यक गोष्टी टाळूनही साध्य करू शकतो…. म्हणून जमल तेवढं लवकर यापासून जरा दूरच गेलेलं बरं…
असं आमचं बोलणं चालूच होतं… मधे मधे ओळखीचे लोकं त्याला पाहून येऊन विचारत होती.
काय, कुठे, कसा, कधी, केंव्हा ???? आदी…
पुन्हा त्याचे स्मितहास्य, नम्रपणा… आणि मोजक्या शब्दांत उत्तर,
” स्वतःची ओळख जवळून करून घेतोय.”
“हे गायब होणं नाही तर, स्वतः ला भेटणं होतं ते.”

आता माझ्याही प्रश्नांच्या मण्यांची माळ एक-एक मणी गळून रिकामी होऊन गळ्याभोवतीचा फास सैल होत-होता.
खूप सारं उमगत होतं…. माझा श्वास मीच घेतो ना! मग त्या श्वासाशी संवाद साधून वावर करायला हवा!!!
स्वतःला लाईक करणं अन स्वतःच्या कृतीवर कंमेंट करणं (चांगली की वाईट हे कृतीप्रमाणेच) अधिक चांगलं… स्वतः च्या कृती पडताळणं अन दोष सुधारणं….

पुढे त्याचं ‘स्व’बद्दल च बोलणं चालूच होतं….

#प्रभाव
( प्रमोद भाऊसाहेब वडवकर )

#Note : या कथेतील ‘तो’ आणि ‘मी’… स्वतः मीच ( #प्रभाव ) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat